खरंच आपली संस्कृती आणि तिने आपल्याला घालून दिलेले नियम हे किती अमुल्य आहेत याची जाणीव परकीय भूमीवर आल्यावर झाली याच खरंच खूप आश्चर्य वाटल. भारतामध्ये जेव्हा रोज त्याच मायमराठीच्या कुशीत जगत होते तेव्हा या गोष्टीची कधीच जाणीव झाली नाही.
स्वित्झर्लंड मध्ये राहत असल्याने जेवणाचे आमंत्रण येणे किंवा कधी मैत्रिणींच्या घरी गेट टुगेदर करणे हे नेहमीचेच. काल असेच मार्टिना नावाच्या एका युरोपियन मैत्रिणीने रात्री जेवणासाठी आमंत्रण दिले होते. ती मुळची इथलीच रहिवाशी असल्याने जेवणासाठी युरोपीन मेनू होते. जेवणाला सुरुवात झाल्यावर आमच्या एक मेकिंच्या संस्कृती आणि रीतीरीवाजविषयक गप्पा सुरु झाल्या. ती भारतीय संस्कृतीबद्धल जाणून घेण्यास खूप आतुर होती, विशेषत: लग्नपद्धतिबद्धल. आमच्यामध्ये खालीलप्रमाणे संवाद रंगला.
"तुमच्याकडे लग्न कशा प्रकारे होते? आपला जीवनसोबती तुम्ही स्वतः निवडता कि तुमचे पालक?" खंर तर मार्टिना चा हा पहिला प्रश्नच विचार करायला लावणारा होता.
"भारतीय लग्न पद्धतीमध्ये या दोन्हीही गोष्टी होतात." खंर तर तिच्या प्रश्नाला हेच एक मध्यबिंदू साधणारे उत्तर मला योग्य वाटले.
"माफ कर पण तुला नेमक काय म्हणायचं ते मला समजल नाही."
"भारतामध्ये वडिलधारे मंडळी स्थळ शोधतात त्यानंतर मुलगा आणि मुलगी यांची भेट घडवण्यासाठी एक कार्यक्रम ठरवला जातो ज्याला कांदेपोहे असही म्हंटलं जात. जर मुलगा-मुलगी आणि त्यांच्या कुटुंबियांना सगळ्या गोष्टी पटल्या तर ते त्याचं लग्न जमवतात"
"पण ते मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी असतात मंग एकाच भेटीमध्ये ते त्यांच्या जीवनातील इतका महत्वपूर्ण निर्णय कसे घेवू शकतात?"
"हेच तर आमच्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे राणी, आमच्या देशात वरिष्ठांच्या शब्दांना पैशापेक्षाही जास्त किंमत आहे. फक्त विश्वासाच्या जोरावर एक नवीन नात एका नव्या पर्वाप्रमाणे उभारलं जात."
"खरंच तुम्ही भारतीय खूप नशीबवान आहात. तुमचे पालनपोषण, शिक्षण अगदी तुमचे लग्न करण्याची जबाबदारीही तुमचे पालक पार पाडतात."
"तुमच्याकडे कशाप्रकारे लग्न होतात?"
"इथे लग्न करण्यासाठी पालकांची परवानगी असावीच असं नाही. जो मुलगा किंवा मुलगी आवडेल त्याच्याशी तुम्ही लग्न करू शकता."
"हे तर खरंच खूप छान आहे."
"यात छान असं काहीच नाही गं. नवीन नात असताना सगळकाही छान वाटत. पण काही काळाने एकमेकांच्या सवयी किंवा स्वभावामुळे भांडण होतात."
"अग मग त्यात इतक चिंता करण्यासारखं काय आहे? भांडण तर कोणत्याही नवरा-बायाकोंमध्ये होतात."
"ते तुला असं नाही कळणार गं. जर तुझा नवरा आणि तुझ्यामध्ये भांडण झाले तर तुम्ही काय कराल?" मार्टिना मला असा प्रश्न का विचारात आहे हे त्यावेळी माझ्या लक्षात आले नाही.
"जर भांडण झालच तर, भांडण होण्याच मूळ कारण शोधून आम्ही त्यावर उपाय काढून आनंदी कस राहता येयील याकडे जास्त लक्ष देवू." मी सरळपणे म्हणाले.
"आणि जर तुम्ही तसं करण्यामध्ये यशस्वी झाला नाही तर?" मार्टिनाने गंभीरपणे विचारले.
"मंग काय, आम्ही आमच्या पालकांना आमच्यातील वाद्विवादाबद्दल कल्पना देवू. ते त्यांच्या अनुभव अन समजदारीच्या जोरावर आमचे प्रश्न एकत्रितपणे सोडवतील अन पुन्हा आम्ही आमच आनंदी जीवन जगायला सुरुवात करू." खंर तर हे तिच्या प्रश्नाला एका भारतीय मुलीचे नैसर्गिक उत्तर होते.
"म्हणूनच मी म्हंटलं तुम्ही भारतीय खरंच खूप नशीबवान आहात. तुमची संस्कृती तुम्हाला नाती अर्ध्यावर सोडून न देता समस्यांवर उपायशोधुन, तडजोड करून आनंदाने जगायला शिकवते." एका युरोपियन स्त्रीच्या तोंडून हे वाक्य ऐकून मला भारतीय असल्याचा अभिमान वाटला पण ती या शब्दांत का बोलत आहे याचे आश्चर्य वाटले.
"तुला माहित आहे आमच्याकडे जर लग्नानंतर काही वादविवाद झाले तर तडजोड किंवा समस्यांवर उपाय हा मार्ग क्वचितच अवलंबला जातो. नवराबायको कोणताही विचार न करता divorce घेवून दुसर लग्नं करण्यास रिकामे होतात. भारतीय संस्कृतीत तुम्ही एकमेकांना जन्मा-जन्मांचेसोबती मानता तुमचा सोबती आयुष्यभर तुमच्यासोबत असणार आहे यामुळे तुम्ही निश्चित असता अन भविष्याची चिंता करण्याचा प्रश्नच उरत नाही. पण इथे ना लग्नाची निश्चितता आहे, ना लग्नं टिकण्याची त्यामुळे आपला भविष्यकाळ कसा असणार आहे याची चिंता नेहमी मनाला खात राहते, कारण तुमच्याकडे एकटेपणात साथ देण्यासाठी तुमचे कुटुंबीय आणि नातलग असतात पण इथे तेही नाहीये." तिच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द मला माझ्या भारत देशाची आणि माझ्या माय मराठीची आठवण करून देत होता तिच्या तोंडावरचे भाव पाहण्यासाठी जेव्हा मी मान वर केली तिच्या डोळ्यांत पाणी होते.
"एका ठराविक वयानंतर नेहमी नवीन मुलगा शोधून परत नाविणपणे गोष्टी सुरु करण्याचाही कंटाळा येतो. जवळ पैसा,सुखसुविधा आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात पण आपली अशी विश्वासाची नेहमी जवळ असणारी व्यक्ती मात्र नसते. कधी कधी तर एकटेपणा खायला उठतो." तीच ते गंभीर बोलणं ऐकून माझं मन भरून आल, जेव्हा घड्याळाकडे नजर गेली ११.४५ झाले होते. रात्रीची वेळ असल्याने मी तो विषय अर्ध्यावर सोडून तिचा निरोप घेतला आणि घराकडे परत निघाले.
अगदी रात्री झोपतानाही तिचा प्रत्येक शब्द माझ्या कानांत जसाच्यातसा घुमत होता. मायभूमीची आठवण तर येतच होती पण तिने दिलेल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा खूप आभिमान वाटत होता. आपल्या भारतीय संस्कृतीचा आपल्यालाच नाही तर परप्रांतीयांनाही तितकाच अभिमान आहे या गोष्टीची जाणीवच पाय परत मायदेशी खेचत होती.